जिल्हा परिषदेला मिळालेल्या साहित्यासह वाहनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : प्रतिनिधी
‘कोविड-19’ प्रतिबंधक लसीकरणासाठी सामाजिक दायित्व निधी अंतर्गत व्हर्लपूल कंपनी व युनायटेड वे यांच्यावतीने पुणे जिल्हा परिषदेला फ्रीज, मास्क, लस वाहतूकीसाठी वाहन उपलब्ध करून देण्यात आले. या साहित्यासह वाहनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.
येथील पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन इमारत परिसरात लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय तिडके, युनायटेड वे या संस्थेचे ‘सी एस आर’ कन्सल्टंट संतोष मोरे, व्हर्लपूल कंपनीचे एच आर डायरेक्टर महेंद्र पाटील व मॅनेजर श्रीकांत कुलकर्णी व जि.प.चे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड लस ने-आण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला शीत साखळीने परिपूर्ण असलेले लस वाहतूक वाहन देण्यात आले. लसीकरणासाठी हे वाहन सामाजिक दायित्व निधीमधून व्हर्लपूल कंपनी ने दिलेले आहे. या वाहनाचा वापर लसीच्या वाहतूक करण्यासाठी होईल. त्याबरोबरच 15 हजार ट्रिपल लेयर मास्क, 300 लिटरचे 2 रेफ्रिजरेटर आणि 2 आ.एल.आर. सुद्धा देण्यात आले आहेत.