बारामती : प्रतिनिधी
कोरोनाच्या भयानक संकटामुळे माणूस माणसापासून दुरावला आहे. त्यातच दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळले. मात्र अशाही परिस्थितीत माणुसकी जिवंत असल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. बारामतीतही काही तरुण मित्रांनी एकत्र येत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मदत करायचा निर्णय घेतला आणि त्यांनी करुन दाखवलं. दिवसभरात सकाळी २०० आणि संध्याकाळी २०० जेवणाचे डबे पोहोचवत या तरुणांनी माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले आहे.
बारामतीतील पत्रकार अमोल निलाखे यांना कोरोना काळात एका मित्राने जेवणाची सोय करण्याची विनंती केली. लॉकडाऊनमुळे हॉटेलही बंद असल्याने निलाखे यांनी घरुनच त्या मित्राला डबा देण्याची व्यवस्था केली. पुढे लॉकडाऊनमुळे अनेकांची जेवणाची मागणी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पत्रकार मित्र सचिन मत्रे, वैभव जगताप, कौशल गांधी, दिपक मत्रे आणि उमेश दुबे यांना सोबत घेत तब्बल ४०० डबे मोफत पोहोच करण्यास सुरुवात केली आहे.
बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी सकाळी २०० आणि संध्याकाळी २०० या प्रमाणे ४०० डबे गेल्या महिन्याभरापासून पोहोच केले जात आहेत. केवळ सामाजिक भावनेतून आणि रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी परवड लक्षात घेवून हे डबे पोहोच करत असल्याचे अमोल निलाखे सांगतात. तर कोरोना या आजारापेक्षा लोकांकडून मिळणारी वागणुक भयंकर आहे. त्यामुळे कुठेतरी रुग्ण आणि नातेवाईकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सचिन मत्रे यांनी सांगितले.
या तरुणांनी एकत्र येत सुरु केलेल्या या उपक्रमाला बारामतीतील अनेक उद्योजक, व्यापारी आणि मित्र परिवारांनी हातभार लावला आहे. अजूनही या ग्रूपला मदत झाल्यास संकटकाळाच्या दिवसात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सोय होणार आहे. त्यासाठी अमोल निलाखे 9822198844 आणि सचिन मत्रे 9561969696 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.