Site icon Aapli Baramati News

यालाच म्हणतात ‘दादा स्टाईल’; शनिवारी निवेदन; मंगळवारी बाबूर्डी आरोग्य उपकेंद्राच्या मंजूरीचा निघाला आदेश

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल अनेकदा चर्चा होत असते. समोर आलेले काम पूर्ण झाल्याशिवाय अजितदादा स्वस्थ बसत नाहीत हे अनेकदा पहायला मिळते. शनिवारी (दि.१२) बाबूर्डी गावचे युवा सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी अजितदादांची भेट घेत गावातील आरोग्य उपकेंद्राचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्याबद्दल निवेदन दिले आणि  आज दि. १५ जून रोजी यासंदर्भात आदेशही निघाला आहे.  त्यामुळे बाबूर्डी गावातील प्रलंबित प्रश्नाचा ‘दादा स्टाईल’ निपटारा झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकासकामांना प्राधान्य देणारे आणि कामाचा प्रचंड उरक असणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कामाच्या स्टाईलची नेहमीच चर्चा होत असते. अजितदादा प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी बारामतीत येवून इथे सुरू असलेल्या विकासकामांच्या पाहणीसह कोरोनासंदर्भात आढावा घेत असतात. याच दरम्यान ते भेटीसाठी आलेल्या नांगरिकांना वेळ देऊन त्यांचे प्रश्न समजावून घेत असतात.

शनिवारी दि. १२ जून रोजी बाबूर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी अजितदादांची भेट घेत गावातील आरोग्य उपकेंद्राचा प्रस्ताव मंजूर नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. बारामती नगरपरिषद हद्दीतील तांदुळवाडी येथील उपकेंद्र बाबूर्डी गावात स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर ना. अजित पवार यांनी आपले स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांना संबंधित निवेदन देत मुंबईत गेल्यानंतर आठवण करून देण्याची सूचना केली.

अजितदादांचा बारामती दौरा झाल्यानंतर सोमवारी कोल्हापूर आणि आज मंगळवारी दुपारपर्यंत महत्वाच्या बैठकांसाठी पुण्यात होते. त्यानंतर आज संध्याकाळी थेट बाबूर्डीसह अन्य गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रांच्या प्रलंबित प्रस्तावांना मंजूरीचा अध्यादेश निघाला आहे. अवघ्या तीन दिवसांत अजितदादांनी बाबूर्डी गावाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावत त्यांच्या कामाची ‘दादा स्टाईल’ दाखवून दिली. सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी अजितदादांचे आभार मानत त्यांच्या कामाच्या धडाकेबाज पद्धतीमुळेच आम्हा कार्यकर्त्यांना बळ मिळत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version