बारामती : प्रतिनिधी
अघोरी उपचार आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याला करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करमाळा पोलिस ठाण्यात मनोहरमामावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास आता सुरु केला जाणार असल्याची माहिती करमाळ्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.
बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाकडून आज मनोहरमामाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर मनोहर भोसलेला करमाळा पोलिसांकडे वर्ग करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने मंजूरी दिल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दुपारी बारामतीच्या उपकारागृहात नेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
कायदेशीर प्रक्रियेनंतर मनोहरमामाला ताब्यात घेत पोलिस करमाळ्याकडे रवाना झाले. करमाळा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात मनोहरमामाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा करमाळा पोलिसांकडून तपास करुन पुढील प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.