बारामती : प्रतिनिधी
बजाज ग्रुपच्या सहकार्यातून पुणे जिल्हा परिषदेला मिळालेल्या कोविशिल्ड लसीचे लसीकरण उद्या मंगळवारी (दि. ३१ ऑगस्ट) होणार आहे. त्यामध्ये बारामती तालुक्यातील १९ हजार जणांना लसीकरण केले जाणार असून शहरातील सहा आणि ग्रामीण भागातील ८५ केंद्रांवर हे लसीकरण पार पडणार आहे.
बजाज ग्रूपच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये बारामती तालुक्यासाठी १९ हजार लासी देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत १८ वर्षावरील सर्व लोकांना पहिला डोस व ८४ दिवस पूर्ण झालेल्या प्रलंबित लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी पहिला डोस व दुसरा डोस अशा स्वतंत्र रांगा लावण्यात येतील. तसेच महिलांसाठी स्वतंत्र रांग करण्यात येणार आहे.
लसीकरण केंद्रावर शिस्तीचे पालन करून उद्याचा महा लसीकरण दिवस शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उद्याच्या एका दिवसासाठी बारामती तालुक्याला एकूण १९ हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व लसी एका दिवसातच वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्व केंद्रे लस संपेपर्यंत सुरू राहणार आहेत. नागरिकांनी प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर नोंदणी करायची आहे. तसेच हॉटस्पॉट गावांमध्ये लसीकरण केंद्रांवर एंटिजेन तपासणी करण्यात येणार आहे. एकाच दिवसांत मोठ्या प्रमाणात लसीकरण होणार असल्याने नागरिकांनी शिस्तीचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.