पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांवरही प्रशासक नेमणार
पुणे : प्रतिनिधी
कोरोना संक्रमणामुळे नगरपरिषद निवडणुका वेळेवर होणार नाहीत. या पार्श्वभूमीवर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या नगरपरिषदांवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. संबंधित नगरपरिषदांची मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासक नियुक्ती करण्यासंदर्भात नगरविकास विभागाने आदेश काढले आहेत. त्यामुळे सध्या तरी नगरपरिषद निवडणुका लांबणीवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता कुठे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच पुन्हा एकदा ओमीक्रॉनचा प्रसार वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुदत संपणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुका वेळेत होणार नसल्याने त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार नगरविकास विभागाने पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या नगरपरिषदांवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचे आदेश पारीत केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, जेजुरी, सासवड, लोणावळा, तळेगाव दाभाडे, जुन्नर, शिरुर, आळंदी या नगरपरिषदांची मुदत संपताच त्या ठिकाणी प्रशासक नेमले जाणार आहेत. तसेच सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या नगरपरिषदांवरही प्रशासकांची नियुक्ती होणार आहे.
नगरविकास विभागाच्या या आदेशामुळे सध्या तरी नगरपरिषद निवडणुका लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात नगरपरिषद निवडणुका जाहीर होतील अशी चर्चा होती. मात्र कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वाढत असल्याने नगरपरिषद निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.