Site icon Aapli Baramati News

माळेगाव परिसरात ग्रामसुरक्षा दलास उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० तरुणांनी केली नोंदणी

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

माळेगाव पोलीस दूरक्षेत्राच्या वतीने माळेगाव, सांगवी, शिरवली आदी परिसरातील तरुणांना ग्राम सुरक्षा दलात सामील होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी  आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. आतापर्यंत जवळपास २०० तरुणांनी नाव नोंदणी केली आहे.

ऐन सणासुदीच्या काळात पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आहे. सणानिमित्त मोठ्या प्रमाणात  नागरिकांची गावाकडे ये-जा चालू झाली आहे. अशावेळी चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता असते. अशा घटना टाळण्यासाठी

पोलीस व तरुणांच्या  सहभागातून ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले आहे.

ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून पोलिसांना सहकार्य करण्याबरोबरच अपघातग्रस्तांना मदत, गावातील घडामोडीची खबर देणे, अवैध धंद्यांची माहिती देणे, संशयास्पद व्यक्ती, चोरी उघडकीस आणण्यास मदत करणे ही जबाबदारी अपेक्षित असल्याचे माळेगाव दूरक्षेत्रचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी सांगितले.

सणासुदीच्या काळात वाढत्या चोऱ्या व इतर अनुचित प्रकार घडू नये,यासाठी माळेगाव पोलीस दूरक्षेत्रातर्फे ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग सामील होऊन उत्स्फूर्तपणे आपल्या गावात रात्री बारा ते चार दरम्यान गस्त करताना पहावयास मिळत आहेत.

ज्या ज्या गावातील तरुणांना ग्राम सुरक्षा दलात सामील व्हायचे आहे त्यांनी माळेगाव पोलीस दूरक्षेत्राशी  संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी केले आहे. दरम्यान, ग्राम सुरक्षा दलातील तरुणांना रात्र गस्त अंमलदारांमार्फत गावोगावी जाऊन कर्तव्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version