बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर आणि तालुक्यात आज १०७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ८१५३ वर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली असून बारामतीकरांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
बारामतीत काल शासकीय प्रयोगशाळेत तपासलेल्या ४१५ पैकी ७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच खासगी प्रयोगशाळेत ४७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामधील २२ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ३१ एंटीजेन टेस्टपैकी १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये शहरातील ६३ आणि ग्रामीण भागातील ४४ जणांचा समावेश आहे.
बारामतीत मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला कोरोना आटोक्यात आणण्याबाबत सूचना दिल्या आहेत. बारामती नगरपरिषदेने शहरात तिसऱ्या टप्प्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच बारामतीत दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजारही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.