बारामती : प्रतिनिधी
प्लास्टिक वापरण्यावर बंदी आहे. तरीही दिवसेंदिवस नागरिकांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर अधिकच वाढत चालला आहे. त्यामुळे शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या वसुंधरा अभियानाच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील प्लास्टिक बंदी निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय बारामती नगरपरिषदेने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.
राज्य शासनाकडून राज्यात थर्माकोल, प्लास्टिक, अविघटनशील पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, हाताळणी, वापर, वाहतुक आणि विक्री अधिसूचना २०१८ लागू करण्यात आलेली आहे. तसेच केंद्र शासनाकडूनही प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रुल्स २०१६ नुसार निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्य शासनाची माझी वसुंधरा ही मोहीम बारामती शहरांमध्ये राबवण्यात येत आहे. मात्र नागरिकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. यामुळे या मोहिमेवर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. यासाठी नगरपरिषदेने प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा, तसेच प्रदूषण कमी व्हावे. याकरिता प्लास्टिक बंदी निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्लास्टिक हा अविघटनशील पदार्थ आहे. यामुळे कचऱ्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा कमी वापर करावा, पर्यावरणपूरक संसाधनाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीकडून प्लास्टिकचा वापर होताना आढळल्यास नगर परिषदेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही रोकडे यांनी दिला आहे.