बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुका रोजगार हमी योजना समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष राहुल वाबळे यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार ही निवड करण्यात आली.
राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून रोजगार हमी योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत विविध कामे मार्गी लावली जातात. राज्य शासनाच्या रोहयो समितीच्या माध्यमातून या कामांवर देखरेख, तसेच प्रस्ताव आदी कामे केली जातात. राज्यातील प्रत्येक तालुक्यात ही समिती गठीत करण्यात आली आहे.
बारामती तालुका रोहयो समितीच्या अध्यक्षपदी राहुल वाबळे यांची निवड करण्याची शिफारस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार राहुल वाबळे यांना अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकोपयोगी कामे करण्यावर भर देणार असल्याचे राहुल वाबळे यांनी निवडीनंतर सांगितले.