Site icon Aapli Baramati News

पुणे जिल्हा बँक निवडणूक : काहींनी जातीचं; तर काहींनी नात्यागोत्याचं राजकारण केलं : उपमुख्यमंत्री अजित पवार

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासमवेत मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागा बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न होता; मात्र त्याला यश आले नसल्याची खंत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचवेळी कुणी जातीवाद करण्याचा प्रयत्न केला, तर कुणी नात्यागोत्याचं राजकारण केल्याचंही त्यांनी म्हटलंय.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सगळ्या जागांवर बिनविरोध निवडून येण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये केवळ १४ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरीत सात जागा बिनविरोध करण्यात दुर्दैवाने यश मिळाले नाही.

पिंपरी-चिंचवड, हवेली, पुणे शहरानंतर बारामतीत दुसऱ्या क्रमांकाचं मतदान आहे. गेल्या तीस वर्षापासून आम्ही चांगल्या प्रकारे काम करत आहोत. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पाच लाखांपर्यंत कर्ज दिले आहे. त्यामुळे आमचं काम चांगलं वाटत असेल तर लोक आम्हाला संधी देतील, असेही अजित पवार यांनी यावेळी नमूद केले.

या निवडणुकीत बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार, आंबेगाव मतदारसंघातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, भोर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, पुरंदर-हवेली मतदारसंघातून काँग्रेस आमदार संजय जगताप, खेड मतदारसंघातून आमदार दिलीप मोहिते पाटील, ‘ब’ वर्गातुन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,  इंदापूर ‘अ’ वर्गातून सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक अप्पासाहेब जगदाळे यांची  बिनविरोध निवड झाली आहे. उरलेल्या सात जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version