बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची आता कुंडली तयार केली जाणार आहे. ज्यांनी दोनपेक्षा अधिक गुन्हे केलेले आहेत, त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. अशा आरोपींनी पुन्हा गुन्हा केला, तर त्यांच्यावर झोपडपट्टी दादा कायदा किंवा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.
सुनील महाडिक यांनी नुकताच बारामती शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षकपदाचा कार्यभार स्विकारला आहे. हा कार्यभार स्विकारल्यानंतर बारामती शहराची कायदा व सुव्यवस्था अधिक चांगली असावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार आता शहर पोलिस ठाण्यात दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या व्यक्तींची माहिती संकलीत केली जात आहे. त्यांचा भविष्यात एखाद्या गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यांच्यावर मोक्का किंवा झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे महाडीक यांनी सांगितले.
पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असणाऱ्या आरोपीबरोबर नवीन आरोपींनी गुन्हा केला, तरी याच कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी गुन्हेगार व्यक्तीच्या कारवाईमध्ये सामील होऊन आपले भविष्य खराब करून घेऊ नये, असे आवाहन या निमित्ताने पोलिसांकडून करण्यात आले आहे.