Site icon Aapli Baramati News

झारगडवाडीत नवनिर्वाचित महिला सरपंच, सदस्य, पदाधिकारी यांच्याकडून कोरोना नियमांची पायमल्ली..! प्रशासन कारवाई करणार का..?

ह्याचा प्रसार करा

डोर्लेवाडी : प्रतिनिधी 

बारामती तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.. तालुक्यात गेल्या चोवीस तासात तब्बल ४५ रुग्ण आढळले असून यामध्ये शहरात ३० तर तालुक्यात ग्रामीण मध्ये १५ रुग्ण आढळून आले आहेत. असे असताना बारामती तालुक्यातील झारगडवाडीतील सरपंच निवडीत नवनिर्वाचित सरपंच आणि पॅनल प्रमुखांनी कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

झारगडवाडीच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम आज पार पडला. या निवडीनंतर महिला सरपंच, सदस्य आणि पदाधिकारी यांना कोरोनाचा विसर पडला. सद्यस्थितीत कोरोनाचा फैलाव वाढत असतानाच नवनिर्वाचित सरपंच आणि समर्थकांनी गुलालाची उधळण करत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला.

कोरोना वाढत असताना मोठ्या प्रमाणात गर्दी करुन जल्लोष करणाऱ्या सरपंच व सदस्याकडून गावातील नागरिकांनी काय बोध घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी नवनिर्वाचित सरपंच वैशाली मासाळ, उपसरपंच सोनाली चव्हाण, पूनम आवटे, अनिता जाधव, पदमनाथ निकम, कल्पना झारगड, नारायण कोळेकर, दयाराम महाडिक, पोपट निकम, राजेंद्र बोरकर, सुखदेव निकम, आप्पासो साळुंके, रमेश बोरकर, सतीश कुलाळ, नितीन मासाळ, नितीन शेडगे, हनुमंत झारगड, राजेंद्र झारगड, राहुल चव्हाण, संतोष मासाळ, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आता कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्या महिला सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी यांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version