माळेगाव : प्रतिनिधी
बारामतीत सध्या विविध विकासकामे सुरु आहेत. विकास करताना अनेकदा काही बाबतीत कटूपणा घ्यावा लागतो. मात्र संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर निश्चितच समाधान होईल असेच असेल, असे सांगतानाच जोपर्यंत बारामतीकरांची साथ आहे तोपर्यंत चुकीचा निर्णय घेणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील राजहंस संकुलाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, पौर्णिमा तावरे, संदीप जगताप, प्रशांत काटे आदी मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या निरा डाव्या कालव्यावर तब्बल २४ पूल बांधले जाणार आहेत. ग्रामस्थांची सुविधा होईल, या उद्देशाने हे पूल बांधले जाणार आहेत असे सांगून अजित पवार म्हणाले, मध्यंतरी बारामती शहरातील एक पूल पाडला. त्यावरून सोशल मिडीयात काहींनी टिका केली. मात्र याकडे मी दुर्लक्ष केले.
विकासकामे करताना कटूपणा घ्यावा लागतो. मात्र संबंधित विकासकामे पूर्ण झाल्यानंतर सर्वांनाच समाधान लाभते, असेही अजित पवार यांनी यावेळी नमूद केले.