बारामती : प्रतिनिधी
साधारणत: मंत्री किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्ती सामान्यांमध्ये वावरताना वेगळ्या अविर्भावात असतात. मात्र पवार कुटुंबीय याबाबत अपवाद असल्याचं पहायला मिळतं. त्याचाच प्रत्यय आज बारामतीतील भाजी मंडईमध्ये बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्या आतार दांपत्यांना आला. अनेक वर्षांपूर्वी सातत्यानं येणाऱ्या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी अचानक त्यांच्या दुकानाला भेट देत आवर्जून आतार दांपत्यांकडून बांगड्या भरुन घेतल्या आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामतीतील विविध संस्थांवर प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सुनेत्रा पवार या नेहमीच साधेपणा जपत असतात. पवार कुटुंबीयांच्या सून म्हणून बारामतीत आल्यानंतर त्या आवर्जून बारामती भाजी मंडईतील रफिकभाई आतार यांच्या ताजमहाल बॅंगल्समध्ये जाऊन बांगड्या भरायच्या. कालांतराने अजितदादांच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. सोबतीला सुनेत्रा पवार यांचाही व्याप वाढला. त्यामुळे या दुकानात जाणं कमी झालं.
आज सुनेत्रा पवार या बारामतीत आल्यानंतर त्यांनी अचानकपणे मंडईत असलेल्या ताजमहाल बॅंगल्स या दुकानाला भेट दिली. आतार दांपत्यांची आवर्जून विचारपूस करत त्यांच्याकडून बांगड्या भरुन घेतल्या. यावेळी आतार दांपत्यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. सुनेत्रा पवार यांनी अचानक भेट देत दाखवलेल्या साधेपणानं हे दांपत्य भारावून गेलं होतं.
सत्ता असो वा नसो राजकारणात पवार कुटुंबीयांचा दबदबा कायमच पहायला मिळतो. मात्र असं असतानाही साधेपणानं वावरत ऋणानुबंध जपणं ही पवार कुटुंबियांची खासीयत असल्याची प्रचिती या निमित्तानं आतार दांपत्यांसह उपस्थितांना आली.