बारामती : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकार झोपेत असतानाच पडेल या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या व्यक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. हे बोलताना चंद्रकांत पाटील झोपेत होते की जागे असा प्रतिप्रश्न करत अजितदादांनी चंद्रकांत पाटील यांच्या व्यक्तव्याची खिल्ली उडवली. जोपर्यंत तीनही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत हे सरकार चालणार असेही त्यांनी स्पष्ट केले.
बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेत्यांना असह्य झाले आहे. त्यांना सर्वाधिक आमदार निवडून येवूनही आपण सत्तेत नसल्याची बोचणी लागलेली आहे. त्यामुळे त्या मानसिकतेतून ते बाहेरच येत नाही. परिणामी कार्यकर्त्यांनी एकडे तिकडे जाऊ नये, भाजपसोबतच राहावं यासाठी काही ना काही पुड्या सोडण्याचे काम भाजप नेते करीत असतात असे अजित पवार यांनी नमूद केले.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत आहे. परंतु काही जिल्ह्यामध्ये आजही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असावा असे सांगून अजित पवार म्हणाले, पुण्यात कोरोनाची स्थिती आटोक्यात येत आहे. त्यामुळे येथील व्यापारी वर्गाकडून वीकएंड लॉकडाऊन रद्द करण्याबाबत मागणी होत आहे. कोरोना स्थिती पाहता याबद्दल सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाईल.