आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामतीमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी 

बारामती तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच कोरोनाच्या चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

         बारामतीमधील विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे,  एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव,  उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,  गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई,  पाटबंधारे विभागाचे  कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे,  ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती नगरपालिकेचे गट नेते सचिन सातव आदी मान्यवरांसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

बारामती तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सर्तकता ठेवावी, गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉझिटिव्हीटी रेट वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी मास्क वापरावा, कोरोना प्रादुर्भावाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अशा सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयाची नविन इमारत, परकाळे बंगला येथील कॅनलवरील रोड व सुशोभिकरण, क्रीडा संकुल, देसाई इस्टेट येथील रस्त्याची पाहणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नविन विश्रामगृह इत्यादी कामाची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पूरग्रस्तांसाठी मदतीच्या साहित्याची वाहने रवाना

▪️बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशन तर्फे 50 हजार रुपयांचे रेनकोट दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठवण्यात आले.
▪️सिद्धिविनायक तरुण मंडळ जाचक वस्ती , सणसर (ता. इंदापूर) यांच्या तर्फे 50 हजार रुपयांचे रेनकोट
व भाजीपाला दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.
▪️सिल्वर ओक युवा प्रतिष्ठान सणसर (ता. इंदापूर) यांच्या तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे 250 फूड पॅकेट. दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.
▪️अविनाश लगड मित्र मंडळ बारामती यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे 70 फूड पॅकेट. बोर्गेवाडी व जुगाईवाडी तारळे विभाग (ता. पाटण) येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.
▪️फेरोरा इंडिया मित्र परिवार, क्षेत्रीय ट्रेकर्स, व क्रिकेट क्लब बारामती यांच्या तर्फे चिपळूण, महाड व रायगड पुरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे 350 फूड पॅकेट पाठविण्यात आले.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय दुग्ध विकास योजनेच्या माध्यमातून बारामती तालुका सहकारी दूध संघाला 261 अडल्टरेशन किट व 74 ए एम सी युनिट मिळाले त्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


ह्याचा प्रसार करा
बारामती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us