सुपे : प्रतिनिधी
अष्टविनायक मार्गातील बारामती व दौंड या दोन तालुक्यांना जोडणारा अष्टविनायकातील मार्ग म्हणजे सुपे-पाटस कुसेगाव घाट रस्ता. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र वनविभागाकडून कुसेगाव घाटात हे काम थांबवण्यात आले होते. मात्र नुकतीच या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
अष्टविनायक योजनेअंतर्गत सुपे-पाटस रस्त्याचे काम करण्यात येत आहे. मात्र कुसेगाव घाटामध्ये वन विभागाकडून हे काम थांबवण्यात आले होते. त्यामुळे या घाटातील दुरवस्था झालेल्या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी होत होती.
वन विभागाच्या किचकट प्रक्रियेमुळे या कामाला विलंब लागत होता. अखेर ही प्रक्रिया पूर्ण होवून या कामाचा पुन्हा एकदा श्रीगणेशा झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
सुपे येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश चांदगुडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या कामाबाबत पाठपुरावा केला होता.