
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नेहमीच महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. केवळ महिलांना स्वावलंबी बनवण्याचा विचार न करता ते कृतीतूनही दाखवले आहे. त्यांच्या याच विचारांचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार हेही समर्थपणे पुढे नेत आहेत, याची प्रचिती आज सिंधुदुर्ग दौऱ्यात आली. सिंधुदुर्ग दौऱ्यात अजितदादांच्या वाहनाचे सारथ्य चक्क तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालकाने करून ‘हम भी किसीसे कम नही’ ही उक्ती सिद्ध करून दाखवली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नेहमीच महिलांना स्वावलंबी बनावं, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत व्हावं यासाठी प्रयत्न केलेत. विशेष म्हणजे महिलांचा संरक्षण दलातील सहभाग किंवा त्यांना राजकारणात संधी देण्याचे महत्वपूर्ण निर्णय शरद पवार यांनीच घेतले. त्यांच्या याच विचारांचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार हे समर्थपणे पुढे चालवत आहेत.
आज अजित पवार हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. सकाळी विशेष विमानाने ते बारामतीतून सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले. सिंधुदुर्गमध्ये विविध कार्यक्रम आणि बैठकांना अजितदादांनी हजेरी लावली. मात्र आजच्या दौऱ्यात अजितदादांचं एक वेगळेपण प्रत्येकालाच अनुभवयाला मिळालं ते म्हणजे त्यांच्या वाहनातील सारथी. आजच्या दौऱ्यात पोलिस दलातील तृप्ती मुळीक या महिला चालकांनी अजितदादांच्या वाहनाचे सारथ्य केलं.
अजितदादा हे नेहमीच वेळेला महत्व देत असतात. त्यामुळे त्यांच्या कामाच्या स्टाईलनुसार त्यांचे चालकही तितकेच तत्पर असतात. आजच्या दौऱ्यात तृप्ती मुळीक यांनीही अजितदादांच्या स्टाईलला साजेसं सारथ्य करून दाखवत ‘हम भी किसीसे कम नही’ ही उक्ती खरी करून दाखवली. त्याचवेळी महिलाही कोणत्याच क्षेत्रात मागे राहत नाहीत, त्यांना संधी दिली पाहिजे हा अजितदादांचा स्वभावही कोकणवासीयांनी अनुभवला.