नाशिक : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल किती दक्ष असतात हे वेळोवेळी अनुभवायला मिळत असते. आज अजितदादा नाशिक दौऱ्यावर आहेत, सकाळी देवळाली मतदारसंघातील पिंपरी सय्यद या गावात विविध विकासकामांचा भूमीपूजन समारंभ पार पडला. या कार्यक्रमात अजितदादांनी येथील क्रीडा संकुलासाठी ५ कोटींचा निधी जाहीर केला.. त्याचवेळी आपले खासगी सचिव अनिल ढिकले हे याच गावचे असल्याचे सांगत, बारामतीकडे कमी लक्ष दिलं तरी चालेल, पण गावाकडे जास्त लक्ष दे असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला.. आपल्या खासगी सचिवांबद्दल असलेली आस्था पाहून उपस्थित ग्रामस्थ आणि व्यासपीठावरील मान्यवरही भारावून गेले.
नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदार संघातील पिंपरी सय्यद या गावात आज तब्बल ५१ कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार सरोज अहिरे, दिलीप बनकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना ना. अजित पवार यांनी सरोज अहिरे यांच्या कामाचे कौतुक करत सातत्याने नवनवीन योजना उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्या प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सरोज अहिरे यांच्या माध्यमातून या परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असल्यामुळे त्यांना ‘विकासकन्या’ असे संबोधण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
देवळाली मतदारसंघात १५ कोटी रुपये खर्चाचे भव्यदिव्य क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आपण ५ कोटींचा निधी जाहीर करत असून हे काम पूर्ण होईपर्यंत निधीची कमतरता भासू देणार असल्याची ग्वाही ना. पवार यांनी दिली. यावेळी आपले खासगी सचिव अनिल ढिकले यांना उद्देशून अजितदादा म्हणाले, ”अनिल तू माझा खासगी सचिव आहेस, तू याच गावचा आहेस. त्यामुळे बारामतीकडे जरा कमी लक्ष दिलं तरी चालेल. पण गावाकडे जरा जास्त लक्ष दे..” मुंबईत गेल्यावर इथल्या कामांबद्दल आठवण करून देण्यास सांगून सर्व प्रक्रिया पार पाडण्याची सूचनाही त्यांनी केली. अजितदादांच्या या प्रेमळ सल्ल्यामुळे अनिल ढिकले यांच्यासह उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थाही भारावून गेले.
एखादा दौरा असो किंवा कार्यालयीन कामकाज.. दादा आपल्या स्टाफची तितकीच काळजी घेताना दिसतात. आज देवळाली मतदारसंघातील पिंपरी सय्यद या अनिल ढिकले यांच्या गावीही अजितदादांनी आपल्या कार्यालयीन सहकाऱ्याविषयी आपुलकी दाखवून दिली. एकूणच काय तर अजितदादा हे कडक आणि शिस्तप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. मात्र ते तितकेच भावूकही आहेत याचीच प्रचिती आज नाशिककरांना अनुभवायला मिळाली.