Site icon Aapli Baramati News

अजितदादांच्या समर्थनार्थ नेटकरी सक्रिय; सोशल मिडीयावर #ISupportAjitdada ट्रेंड

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

मागील दोन दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या भगिनी आणि पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच आता अजित पवार यांच्या समर्थनार्थ नेटकरी सक्रिय झाले आहेत. #ISupportAjitdada या ट्रेंडअंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर पोस्ट शेअर होत आहेत.

मागील दोन दिवसांपासून अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांसह त्यांच्या भगिनी आणि मुलांच्या कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. याबाबत अजित पवार यांनी आयकर विभागाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सत्य जगासमोर येईल अशी प्रतिक्रिया देत, संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करू असेही सांगितले आहे.

आज पुण्यातील विधानभवनात कोरोना आढावा बैठकीदरम्यान अजित पवार यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत घोषणाबाजी केली. भाजपकडून जाणीवपूर्वक अजित पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आता नेटकरीही सोशल मिडीयामध्ये सक्रिय झाले आहेत. #ISupportAjitdada   या ट्रेंडअंतर्गत अजित पवार यांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर करत नेटकरी आपला पाठिंबा दर्शवत आहेत.

आयकर विभागाच्या छाप्यानंतर कालपासूनच सोशल मिडीयात तरुणाईकडून अजितदादांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर होताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या कामाबद्दल लिहितानाच या पोस्टमधून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे.

‘दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणारही नाही’ यासह ‘आमचा अभिमान, आमचा ताकद, आमची शान अजितदादा’, ‘भाजपा जे पेरतंय तेच उगवणार, याचा हिशोब भाजपाला एक ना एक दिवस नक्की चुकता करावा लागणार…’ अशा आशयाच्या पोस्ट टाकण्यात येत आहेत. एकूणच आयकर विभागाच्या छाप्यानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच सोशल मिडीयावरही तरुणाई आक्रमक झाली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version