कोल्हापूर : प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या शुक्रवारपासून ग्रामीण भागात राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी दिली.
शेतीसाठी दिवसा १० तास वीज देण्यात यावी, वीज बिल वसुली थांबवावी, शेतकऱ्यांना दिलेली शेतीपंपाची चुकीची बिले तातडीने दुरुस्त करण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथील महावितरण कंपनीसमोर बेमुदत धरणे आंदोलन अद्याप सुरू आहे. त्यातच आता राजू शेट्टी यांनी नवीन आंदोलनाची घोषणा केली आहे.
येत्या काही दिवसांत सरकार आम्हाला चर्चेसाठी बोलावू शकतात. आम्हीही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. त्यासाठी आज सकाळी मला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा फोन आला होता. परंतु जोपर्यंत यातून काही उपाय निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे. धरणे आंदोलन सुरु ठेवूनच आपण सरकारशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.