Site icon Aapli Baramati News

IMP NEWS : ‘त्या’ बारा लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान व नमो किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी धनंजय मुंडेंची विशेष मोहीम

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हफ्त्यापासून राज्यातील १२ लाख पात्र शेतकरी भूमी अभिलेख अद्ययावत नसणे, ई – केवायसी नसणे तसेच बँक खात्याशी आधार संलग्न नसणे या कारणांनी वंचित राहिले होते. मात्र यापुढे या दोन्ही योजनांपासून राज्यातील पात्र शेतकरी वंचित राहू नयेत याचा विचार करून या तीनही प्रकारच्या नोंदण्या व अटींची पूर्तता एकत्रित व गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदार, तालुक्याचे भूमिअभिलेख अधिकारी व तालुका कृषी अधिकारी या तिघांची संनियंत्रण समिती गठित करण्यात आली असून त्यांच्या देखरेखीखाली गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सेवक यांनी वरील तीन अटींमुळे लाभापासून वंचित राहिलेले शेतकरी शोधून त्यांच्या मार्फत तीनही अटींची पूर्तता करण्यात येईल, अशा स्वरूपात ही मोहीम गतिमान पद्धतीने १५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येईल.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे नुकतेच वितरण झाले असून महाराष्ट्रातील ९७ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी ८५ लाख शेतकऱ्यांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला. १२ लाख शेतकरी पात्र असूनही भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत नसणे, ई-केवायसी नसणे तसेच बँक खात्याशी आधार संलग्न नसणे, या तीन कारणांनी वंचित राहिले.

आता राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या नमो किसान सन्मान योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यापूर्वी केंद्राच्या योजनेतून वंचित राहिलेल्या १२ लाख शेतकऱ्यांच्या सर्व अटींची पूर्तता करण्याचे काम कृषी विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेऊन हाती घेतले आहे.

याबाबत धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाच्या सचिवांना एक पत्र देऊन आवश्यक सूचना केल्या आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही केली जात आहे. सदर मोहीम यशस्वी झाल्यास राज्यातील या १२ लाख शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ व राज्याच्या नमो किसान सन्मान योजनेचा असा दुहेरी लाभ मिळणार आहे.

ही मोहीम १०० % यशस्वी होऊन राज्यातील एकही पात्र शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो किसान सन्मान योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी प्रयत्न करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे, तसेच जे पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांनी संनियंत्रण समितीशी संपर्क करून आपले केवायसी व अन्य अटींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version