
कोल्हापूर : प्रतिनिधी
शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांची ही मागणी मान्य होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वत: मैदानात उतरले आहेत. परंतु सरकारने त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज देते. कर्नाटक सरकार दिवसा ७ तास मोफत वीज देते, तर राजस्थान सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असून कृषिप्रधान महाराष्ट्र सरकारला काय लकवा मारला आहे का ? असा संतप्त संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांच्या या मागणीसाठी राज्य सरकारला रास्ता रोको आंदोलनाद्वारे जागे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. याच मुद्द्यावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला असून आता त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.