मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दीपावली पूर्वी पीक विम्याची मदत नाही मिळवून दिली, तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा करणाऱ्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना आज शेतकऱ्याने “साहेब पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत, आता दिवाळी साजरी करा” अशी भावनिक साद घातली. दिवाळीची भेट वस्तू देऊन भावनिक पत्र सुद्धा दिले.
यावर्षी राज्य शासनाने एका रुपयात पीक विमा देण्याची घोषणा करून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. मात्र पावसाने २१ दिवसापेक्षा जास्त खंड दिल्यामुळे या पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरले. मात्र अनेक पिक विमा कंपन्यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करत विम्याबाबत चाल ढकल, अपील केले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती.
याबाबतची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊपर्यंत सार्वजनिक सभा आणि समारंभात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुष्पगुच्छ व हार सुद्धा स्वीकारले नाहीत. या दरम्यान २६ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेचा २००० रुपयांचा हप्ता थेट खात्यात वर्ग करण्यात आला. तसेच ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ देण्याचे मान्य करून रक्कम खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या माध्यमातून राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपये वर्ग होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन सणा-सुदीच्या दिवसात थोडासा आधार मिळाला आहे.
याबद्दल एका शेतकऱ्याने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एक भावनिक पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. या पत्रासोबत त्यांनी दिवाळीची भेट वस्तू देऊन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना आता आपणही दिवाळी साजरी करा अशी साद घातली. याप्रसंगी कृषी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा सद्गदित झाल्याचे दिसून आले.
गोविंद देशमुख नामक एका प्रगतशील शेतकऱ्यांने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “यावर्षी कुठे अतिवृष्टी झाली तर कुठे दुष्काळामुळे शेतकरी होरपळला. परंतु राज्याच्या कृषीमंत्रीपदावर आपण विराजमान असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला एक आशेचा किरण दिसला.
तुम्ही म्हणालात की, प्रधानमंत्री पीकवीमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही. तेंव्हाच आम्हाला वाटले की आमच्या घरातीलच कोणी कृषीमंत्रीपदावर विराजमान आहे..
आपण शब्द पाळला, खरा करून दाखवला..!
राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपये वितरीत झाले. खुप खुप अभिनंदन ! आपल्या बीड जिल्ह्यात ७ लाख शेतकऱ्यांना २४१ कोटी रुपये मिळणार आहेत त्याबद्दल्ही आपले हार्दीक अभिनंदन ! आम्हाला खात्री आहे की, आपल्या पदाचा आपण असाच फायदा गोरगरीबांना मिळवून द्याल, असेही या पत्रात नमूद केले आहे.