मुंबई : प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो घाबरू नका… ऊस गाळप संपवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे… कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका… सरकार तुमच्या पाठीशी आहे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बीड येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी हे आवाहन केले आहे.
जनता दरबार उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ऊसाचे काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे. सध्या गळीत हंगाम वाढला आहे. मे महिन्यात रिकव्हरी लॉस आहे. यावर साखर आयुक्त व सहकारमंत्री आढावा घेत आहेत. बीड जिल्हयात दु:खद घटना घडली आहे. आमच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली यावर बोलताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांना सरकारच्यावतीने विश्वास दिला.
राज्यातील शिल्लक उसाबाबत राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता शासन घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन टोकाचा निर्णय घेऊ नये. सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.