
बारामती : प्रतिनिधी
नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणावरून बारामतीसह पुरंदर आणि इंदापूर तालुक्यात दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यातून अस्तरीकरणविरोधी आणि समर्थनार्थ आंदोलनेही झाली. त्यानंतर हे काम थांबण्यात आले आहे. मात्र आता जलसंपदा विभाग आणि नीरा डावा कालव्याचे लाभधारक शेतकरी यांच्यात चर्चा व्हावी, त्यांच्या भूमिका लक्षात याव्यात यासाठी शुक्रवार दि. १६ सप्टेंबर रोजी बारामतीत बैठक होणार आहे.
नीरा डावा कालवा अस्तरीकरणावरुन मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगली आहे. काही भागात समर्थन देण्यासाठी, तर काही भागात अस्तरीकरणाच्या विरोधात आंदोलने झाली. या दरम्यान, एकदाही शेतकरी आणि जलसंपदा विभागाची समोरासमोर चर्चा झाली नाही. मात्र आता उद्या शुक्रवार दि. १६ सप्टेंबर रोजी याबाबत अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये याबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. बारामतीतील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे.
नीरा डाव्या कालव्याच्या १५२ किलोमीटरपैकी वेगवेगळ्या २९ ठिकाणी सुमारे ३५ किलोमीटर अस्तरीकरण होणार आहे. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या असून कामे सुरू करण्याची तयारीही करण्यात आली होती. मात्र बारामती तालुक्यातून या अस्तरीकरणाच्या कामाला विरोध सुरू झाला. त्यानंतर पुरंदर व इंदापूरमधील शेतकरीही यात सहभागी झाले. दुसरीकडे अस्तरीकरण करण्याच्या मागणीसाठीही शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. लांबच्या अंतरावरील शेतकऱ्यांचा अस्तरीकरणाला पाठिंबा असला तरी, कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचा याला विरोध असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या मत-मतांतराच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभाग आणि शेतकरी यांच्यात चर्चा घडवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. अस्तरीकरणाबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्यामुळे या बैठकीत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या बैठकीत उपस्थित राहून आपापली मते मांडावीत असे आवाहन जलसंपदा विभागासह शेतकरी प्रतिनिधींनी केले आहे.
बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल..?
या बैठकीत जलसंपदा विभागाची भूमिका मांडली जाईल. तसेच पाण्याच्या भविष्यातील नियोजनाबाबत शंकांचे निरसन केले जाणार आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांचा विरोध आणि त्यामागील कारणे यांचाही आढावा घेतला जाईल. त्यामुळे या बैठकीनंतर अस्तरीकरणाच्या कामाबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.