मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. थकबाकीमुळे शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया आजपासून थांबणार आहे. ज्यांची वीज तोडली आहे, त्यांना पूर्ववत वीज जोडून दिली जाणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली. यंत्रमागांचा वीजपुरवठाही पूर्ववत करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज तोडण्याची मोहीम सुरू केली होती. त्यामुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत होता. आज विधानसभेत विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांकडूनही हा निर्णय बदलण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आजपासून वीज तोडणी मोहीम थांबवण्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांच्या हाती पीक येईपर्यंत म्हणजेच पुढील तीन महीने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबणार आहे. तसेच ज्यांची वीज तोडण्यात आली, त्यांचा वीजपुरवठाही पूर्ववत केला जाणार आहे. यंत्रमाग उद्योगालाही राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला असून त्यांचीही वीज तोडणी थांबवून त्यांनाही पूर्ववत वीजपुरवठा केला जाईल असे नितीन राऊत यांनी जाहीर केले.