Site icon Aapli Baramati News

BREAKING NEWS : शेतकऱ्यांना पीककर्ज देताना हात आखडता घेऊ नका; सीबील सक्तीही नको : बँकर्स समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी सीबीलची सक्ती करू नये, तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्ज देताना हात आखडता घेऊ नये असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सहकारी बँकांच्या बळकटीकरणासह शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय या  बैठकीत घेण्यात आले.

मुंबईत आज महाराष्ट्र राज्य बँकर्स समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत सहकारी बँकांच्या बळकटीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासन पातळीवर सहकारी बँकांच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत झालेल्या चर्चेत सीबील स्कोअरची सक्ती न करता कर्ज देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये असे स्पष्ट निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांसाठी या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून बँकांकडून शेतकऱ्यांना अधिकचे सहकार्य होईल या अनुषंगाने प्रयत्न व्हावेत असेही या बैठकीत सूचित करण्यात आले. दरम्यान, बँकर्स समितीकडून सन २०२४-२५ साठी ४१ हजार २८६ कोटी रुपयांचा नवीन वार्षिक पत आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात आला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version