
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या वीज तोडणी मोहिमेच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी दोन तास पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
आज पुणे-सोलापूर महामार्गावर हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन केले. जोपर्यंत वीज जोडली जात नाही तोपर्यंत रस्त्यावरुन हटणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली होती. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनादरम्यान भ्रमणध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधला. आम्ही देखील विजेचा प्रश्न उचलून धरत आहोत, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. अधिवेशन संपेपर्यंत योग्य तो सकारात्मक निर्णय आम्ही सरकारला घ्यायला लावू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकाना दिले.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी महाविकास आघाडीसह राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंवर कडाडून टिका केली. इंदापुरच्या लोकप्रतिनिधींना घोड्यावर बसायला वेळ आहे, रथामध्ये फिरतात, पार्ट्या करतात परंतु सूरज जाधव सारखा शेतकरी आत्महत्या करतोय, त्याकडे त्यांना पाहायला वेळ नाही असा घणाघात हर्षवर्धन पाटील यांनी भरणेंवर केला.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. महावितरणने उद्या संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे केले जाईल असा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी सरकारला दिला आहे.
या आंदोलनात राज्य साखर संघांचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, ॲड. कृष्णाजी यादव, भरत शहा, देवराज जाधव, करणसिंह घोलप, विलास वाघमोडे, मयुरसिंह पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार,गजाजन वाकसे, बाबा महाराज खारतोडे, लालासाहेब पवार यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी झाले होते.