Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : वंचित शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राबवली मोहीम; आता १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ‘या’ योजनेचा मिळणार लाभ..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पी एम किसानचा पुढील हप्ता त्याचबरोबर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबवली होती. या मोहिमेद्वारे राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत.

कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पुढाकार घेऊन कृषी, महसूल, भूमी अभिलेख आदी विभागांचा समन्वय साधून ई-केवायसी पूर्ण करणे, भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून घेत राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी या दोन्हीही योजनांच्या लाभास पात्र करवून घेतले आहेत.

पी एम किसान योजना जेव्हा नव्याने सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यांपैकी सुमारे ९५ लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र वरील अटींची पूर्तता न केल्याने १३ व्या आणि १४ व्या हप्त्यात त्यापैकी ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना पी एम किसानचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. १५ व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली आहे. मुळात ९५ लाख पैकी मयत, कर भरणारे व इतर कारणांनी रद्द करून ९२.८७ लाख शेतकरी पात्र ठरत आहेत. पण त्यांपैकी ८२.५९ लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झालेले होते.

धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेतल्यानंतर ग्राम पंचायत पदाधिकारी, कृषिमित्र, यांसह कर्मचाऱ्यांनी कॅम्प घेऊन, बांधावर जाऊन १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते संलग्न करणे, भूमिअभिलेख नोंदी पूर्ण करून अद्ययावत करून घेणे या अटींची पूर्तता करून घेतली. यामध्ये ९.५८ लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे, २.५८ लाख शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न करणे, १.२९ लाख शेतकऱ्यांचे भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे बाबत कामकाज पूर्ण झाले आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी सातत्याने विभागाच्या बैठका घेऊन वारंवार आढावा घेतल्याने या कामाला आणखीनच गती प्राप्त झाली.

शिर्डीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता होणार एका क्लिकवर वितरित

दरम्यान, राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना २ हजार रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्याचे गुरुवारी (दि.२६) रोजी शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार असून यासाठी कृषी विभागाने १७२० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version