Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : शिंदे सरकारच्या २३ दिवसांच्या काळात ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही असं सांगत मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या २३ दिवसांच्या कार्यकाळात तब्बल ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मंत्रीमंडळ विस्तार दिवसेंदिवस लांबणीवर पडत असतानाच शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही संवेदनशील आहोत हे दाखवणाऱ्या सरकारच्या काळात आत्महत्या थांबल्या नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले आहे. या सरकारला तब्बल २३ दिवस पूर्ण होवून गेले असून अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. आमच्या सरकारच्या काळात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जाहीर केले होते. अशातच आता २३ दिवसांत तब्बल ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.राज्यातील औरंगाबाद, बीड, यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक घोषणा केल्या. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देणारी एकही घोषणा सरकारकडून झालेली नाही. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुबार पेरणी चं संकट शेतकऱ्यांसमोर घोंगावत असताना राज्याला कृषिमंत्री मिळालेला नाही. त्यामुळे कृषि खात्याचा कारभार सध्या रामभरोसे असल्याची परिस्थिती आहे.

मागील २३ दिवसांमध्ये सर्वाधिक आत्महत्या औरंगाबाद जिल्ह्यात झाल्या आहेत. बीडमध्ये १३ आणि यवतमाळमध्ये १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परभणी ६, जळगाव ६, जालना ५, बुलडाणा ५, उस्मानाबाद ५, अमरावती ४, वाशिम ४, अकोला ३, नांदेड २ आणि भंडारा-चंद्रपूरमध्ये २ अशा ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version