आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
कृषि जगत

BIG BREAKING : सोमेश्वर साखर कारखान्याने फोडली ऊसदराची कोंडी; ३३५० रुपये प्रतिटन दर जाहीर करणारा ‘सोमेश्वर’ ठरला राज्यातील पहिला कारखाना

कृषि जगत
ह्याचा प्रसार करा

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२२-२३ या हंगामात गाळप केलेल्या उसाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिटन ३३५० रुपये दर जाहीर केला आहे. संपूर्ण राज्यात एफआरपीपेक्षा प्रतिटन ५०० रुपये जादा दर देणारा सोमेश्वर हा पहिला कारखाना ठरला आहे. संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा दर निश्चित करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

मागील गाळप हंगामात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने १२ लाख ५६ हजार ७६८ टन उसाचे गाळप करून सरासरी ११.३६ टक्के एवढा साखर उतार मिळवत १४ लाख ६७ हजार ९५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले. तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ८ कोटी ९२ लाख ५१ हजार ७७९ युनिट विजेची निर्मिती केली असून ५ कोटी ७१ हजार ७९७ युनिटची विक्री केली असल्याचे सांगून अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाद्वारे ९१ लाख ७ हजार २८७ लीटर अल्कोहोल आणि ४१ लाख ९५ हजार ९८४ लीटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे.

सन २०२२-२३ या वर्षात गाळप झालेल्या उसाला एफआरपीनुसार २८५० रुपये प्रतिटन दर बसत आहे. परंतु कारखान्याने सभासद व बिगर सभासद ऊस उत्पादकांच्या खात्यात २९०० रुपये प्रतिटन प्रमाणे रक्कम खात्यात वर्ग केली. उर्वरीत रक्कम दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्याचा मानस असल्याचे पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.  अजितदादांचे सातत्याने मिळणारे मार्गदर्शन, काटकसर, नियोजनबद्ध कामकाज, साखर विक्री धोरण यासह उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांमधून मिळालेले ५० कोटी रुपयांचे अधिकचे उत्पन्न यामुळे ऊस दरात उच्चांक राखणे शक्य झाल्याचेही पुरुषोत्तम जगताप यांनी नमूद केले.

कारखान्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. नुकताच कारखान्याचा ताळेबंद ना. पवार यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी अधिकाधिक ऊसदर देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची सूचना केली होती. त्यामुळे हा ऐतिहासिक दर देता आल्याचे नमूद करून सभासद अथवा बिगर सभासद असा कोणताही भेदभाव न करता सरसकट हा ऊसदर दिला जात असल्याचा अभिमान असल्याचे जगताप यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते शरद पवार, ना. अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून सातत्याने कारखान्याला मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत असते. तसेच ऊस उत्पादक सभासद, अधिकारी, कामगार आणि ऊस तोडणी वाहतूकदार, कामगारांच्या सहकार्यातून ही घोडदौड अशीच कायम राखण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही जगताप यांनी दिली. मागील पाच हंगामातही सोमेश्वर कारखाना ३ हजारपेक्षा अधिक दर देत आहे. यापुढील काळातही सर्वोच्च दर देण्यासाठी कारखाना कटिबद्ध राहील असेही त्यांनी सांगितले.

 


ह्याचा प्रसार करा
कृषि जगत
Back to top button
Contact Us