कोल्हापूर : प्रतिनिधी
शेतकऱ्यांकडून दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करूनदेखील राज्य सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे. त्यामुळे राज्य सरकारला घेरण्यासाठी एकाही मंत्र्याला राज्यभरात फिरू देणार नाहीत असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी २५ नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे.
कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राजू शेट्टी बोलत होते. एफआरपीच्या कायद्यात बदल करावा, डिजिटल वजन काटे करावे, चालू हंगामामध्ये गेल्या हंगामापेक्षा दोनशे रुपये अधिक भाव मिळावा याकरिता दोन दिवस आंदोलन करण्यात आले. परंतु याबाबत असंवेदनशील असणाऱ्या राज्य सरकारने चर्चेसाठी देखील बोलावण्यात आले नसल्याची खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
‘स्वाभिमानीने’ पंजा मारला नाही. त्यामुळे कोणी आम्हाला वाघ समजत नसेल तर आम्ही वाघ आहोत का शेळी हे त्यांना दाखवून देऊ. आजपासून राज्यात मंत्र्यांना फिरू दिले जाणार नाही. ज्या ठिकाणी मंत्र्याचा कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी जाऊन मंत्र्याला अडवले जाईल. तसेच २५ नोव्हेंबरला राज्य भारत राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग आडवून हिसका दाखवून देणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.