पुणे : प्रतिनिधी
नीरा उजवा, डावा कालवा भीमा, आसखेड, पवना आणि चासकमान प्रकल्पांच्या कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. सध्या सुरू असलेल्या नीरा उजवा आणि डावा कालवा आवर्तनाला जोडून आणखी एक आवर्तन ३० जूनपर्यंत देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्यामुळे बारामती, इंदापूरसह आसपासच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नीरा प्रणालीअंतर्गत वीर, नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी या धरणात ३५.५३ टीएमसी पाणी शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत १.७५ टीएमसीने हा पाणी साठा जास्त आहे. त्यामुळेच जास्त आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या चासकमान प्रकल्पातून आवर्तनासह दोन उन्हाळी आवर्तने सोडण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार अशोक पवार, भिमराव तपकिर, चेतन तुपे, समाधान अवताडे, सुनील शेळके, राम सातपुते, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले, पुणे पाटबंधारे मंडळाचे अभियंता संजीव चोपडे, खडकवासला पाटबंधारे विभागाचे विजय पाटील, नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर उपस्थित होते.