
मोरगाव : प्रतिनिधी
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथील भाद्रपद यात्रा उत्सव व मुक्तद्वार दर्शन शनिवार १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बुधवार दि. २० सप्टेंबरपर्यंत सलग पाच दिवस पहाटे ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत मयुरेश्वराच्या गाभार्यात जाऊन मुख्य मूर्तीला गणेश भक्तांना स्वहस्ते जलस्नान व अभिषेक घालण्याची पर्वणी साधता येणार असल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
मोरगाव येथील भाद्रपती यात्रा उत्सव शनिवार १६ ते २१ सप्टेंबरपर्यंत संपन्न होणार आहे. या उत्सवानिमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्ट व मोरगाव ग्रामस्थांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षी तिथीचा क्षय नसल्याने सलग पाच दिवस मयुरेश्वराच्या मुख्य मूर्ती गाभार्यात जाऊन सर्व धर्मीयांच्या गणेशभक्तांना श्रींस स्वहस्ते जलस्नान व अभिषेक करण्याची पर्वणी साधता येणार आहे. पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत भक्तांना श्रींच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये जाता येणार आहे.
भाद्रपद शुद्ध प्रतिपदा शनिवार दि. १६ ते भाद्रपद शुद्ध तृतीया सोमवार दि १८ या कालखंडामध्ये मयुरेश्वरास दुपारी ३ वाजता आदिलशाही काळातील पुरातन हिरे, माणिक, मोती युक्त सुवर्ण अलंकार चढवण्यात येणार आहेत. तर महासाधू मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती पालखी सोहळ्याचे आगमन सोमवार दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे. या दरम्यान संपूर्ण गावात ग्राम प्रदक्षिणा घालत असताना घरोघरी रांगोळीचा सडा व फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे. या दिवशी सायंकाळी नऊ वाजता मयुरेश्वर व मंगलमूर्ती भेट सोहळा संपन्न होणार आहे.
या उत्सवाच्या निमित्ताने द्वार यात्रेची विशिष्ट अशी परंपरा असून मंदिरापासून चार दिशेला सुमारे ६० किमी अंतरावर असणारे धर्म, अर्थ ,काम, मोक्ष ही द्वार मंदिरे असून गेल्या पाचशे वर्षापेक्षा अधिक या द्वार यात्रेची परंपरा आहे, ती आजही येथे सुरू आहे. या द्वार यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व अन्य राज्यातून शेकडोंच्या संख्येने भाविक येत असतात. या उत्सवाच्या निमित्ताने आरती, महापूजा, महानैवेद, शेंदूरपुडा, श्रींचा विवाह सोहळा असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून दिनांक २१ सप्टेंबर रोजी मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती पालखी सोहळा पुन्हा चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे.