आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

CRIME BREAKING : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत; कॉलेजमध्ये झालेल्या वादातून हडपसरमध्ये कोयता गॅंगकडून राडा, एक तरुण गंभीर जखमी

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे शहरात पोलिसांकडून सातत्याने उपाययोजना होत असतानाही पुन्हा एकदा कोयता गॅंगनं डोके वर काढले आहे. आज पुणे शहरातील हडपसर परिसरातील म्हाडा वसाहतीत कोयता गॅंगने धुमाकूळ घातला. महाविद्यालयातील किरकोळ वादातून कोयता गॅंगच्या ८ ते १० जणांनी हडपसरमधील गोसावीवस्तीत एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिलिंद मधुकर कांबळे (वय २३) असे या घटनेतील जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, हडपसर परिसरात असलेल्या एका महाविद्यालयात मिलिंद याचा काही तरुणांशी वाद झाला. त्यानंतर या तरुणांचे टोळके मिलिंद राहत असलेल्या गोसावीवस्ती येथे पोहोचले. त्या ठिकाणी हातात कोयते घेऊन या टोळक्याने मिलिंदवर हल्ला चढवला.

या हल्ल्यात मिलिंद कांबळे हा गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेनंतर गोसावीवस्ती परिसरात एकच खळबळ उडाली असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपूर्वी कोयता गॅंगने पुणे शहरात धुमाकूळ घातला होता. त्यावेळी पोलिसांनी कठोर पावले उचलत कारवाई केली होती. त्यामध्ये अनेकांना गजाआड करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, ज्या भागात या गॅंगने दहशत माजवली, त्या ठिकाणीच पोलिसांनी संबंधित आरोपींची धिंडही काढली होती. या दरम्यान, शहरात विविध परिसरात कोबिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते. त्यामुळे काही काळ का होईना या गॅंगची दहशत मोडीत निघाल्याची स्थिती होती. मात्र आता पुन्हा अशा टोळ्या सक्रिय झाल्यामुळे पोलिस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us