इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नीरा डावा कालव्याचे फाटा ५९ ते ३६ पर्यंत शेतीचे खरीप हंगामाचे आवर्तन उद्या गुरुवार दि. २७ जुलैपासून सुरू होत आहे. टेल टू हेड पद्धतीने हे आवर्तन दिले जाणार असून, ५९ फाट्याच्या टेलला असणाऱ्या पिठेवाडी-लाखेवाडीपासून आवर्तनास सुरुवात होईल, त्यामुळे पावसाअभावी अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन हे नवीन ऊस पिकाच्या लागवडीसाठी, शेतातील उभ्या ऊस पिकासाठी तसेच खरीप हंगामातील पिकांसाठी देण्यात येणार आहे. यासंदर्भात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. डुबल यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. निरा डावा कालव्याचे सदरचे पिकांचे रोटेशन संपलेनंतर तातडीने शेटफळ तलावात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
नीरा नदीवरील सर्व बंधाऱ्यांची दुरुस्ती
नीरा नदीवरील अनेक बंधार्यांना गळती असल्याने, त्यामध्ये पुरेसा पाणी साठा होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे नीरा नदीवरील तावशी, जांब, कुरवली, कळंब, निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, पिठेवाडी, भगतवाडी (आनंदनगर), सराटी, लुमेवाडी, गिरवी, नरसिंहपूर या १५ बंधाऱ्याची येत्या आठ दिवसात तपासणी करावी. त्यानंतर सर्व्हेनुसार बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करून, बंधाऱ्यांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होईल याचे नियोजन करावे, असा निर्णयही कार्यकारी अभियंता डी. एम. डुबल यांचेशी चर्चेमध्ये झाल्याची माहितीही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.