नाशिक : प्रतिनिधी
मनसे नेते तथा मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, सिन्नरजवळील समृद्धी महामार्गावर अमित ठाकरे यांची कार टोलनाका कर्मचाऱ्यांनी अडवली. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर तोडफोड करत राडा केला. अमित ठाकरे गेल्यानंतर ही तोडफोडीची घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तीन दिवसांपासून अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. धुळे, नंदूरबार, जळगाव आदी जिल्ह्यात त्यांचे मेळावे झाले. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री अमित ठाकरे मुंबईकडे निघाले होते. ताफा समृद्धी महामार्गावरील सिन्नरजवळ असलेल्या टोलनाक्यावर आल्यानंतर अमित ठाकरे यांची कार टोलनाका कर्मचाऱ्यांनी थांबवली. फास्टटॅग यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अमित ठाकरे यांना त्या ठिकाणी थांबून राहावे लागले. मात्र त्यानंतर अमित ठाकरे हे निघून गेले.
या घटनेनंतर मनसेचे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत टोलनाक्याची तोडफोड केली. जवळपास २-३ वाहनातून आलेल्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली. याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधितांवर कारवाई होते का याकडे लक्ष लागले आहे.