कल्याण : प्रतिनिधी
मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच ठाकूर्ली रेल्वे स्थानक परिसरात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आईच्या डोळ्यांसमोर आजोबांच्या हातून एक चार महिन्यांचं बाळ निसटून नाल्यात वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बाळाचा शोध सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा कोलमडली असून प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या ठाकूर्लीसह डोंबिवली स्थानकात अडकून पडत आहेत. आज दुपारी ठाकूर्ली रेल्वे स्थानकाजवळ एक लोकल ट्रेन बराच काळ अडकली होती. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वे रुळावरून कल्याण बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. अतिशय छोट्या जागेतून वाट काढत पुढील बाजूला जावे लागत होते.
अशाही स्थितीत काही प्रवाशांनी वाट काढत दुसरी बाजू गाठली. याच रस्त्याने एका चार महिन्यांच्या चिमूकल्याला घेऊन एक आजोबा आणि त्यांची मुलगी चालत जात होते. त्यावेळी आजोबांच्या हातून हे बाळ निसटलं आणि ते थेट बाजूला वाहणाऱ्या नाल्यात पडलं. नाल्यात आपला चिमुरडा वाहत जाताना पाहून आईने अक्षरश: हंबरडा फोडला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमात प्रचंड व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून बाळाचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर प्रवाशी व नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.