मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अजित पवार यांना शुभेच्छा देत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही केली. दरम्यान, मी अडीच वर्षे अजितदादांसोबत काम केलं असून त्यांचा स्वभाव माहिती आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या अडचणीत ते नक्कीच मदत करतील असा विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवनात हजेरी लावली. या दरम्यान, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आदित्य ठाकरे, अनिल परब, सचिन अहिर, सुनील प्रभू यांच्यासह अन्य आमदारही उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. या भेटीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही सर्वजण आज अजितदादांना भेटलो आणि त्यांच्या माध्यमातून जनहिताची कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्तेची साठमारी सुरू असताना सध्या निर्माण झालेल्या पूर, अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटांकडे दुर्लक्ष होऊ नये अशीही चर्चा झाली.
मी अडीच वर्षे अजितदादांसोबत काम केलं आहे. त्यामुळं मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. शेतकरी किंवा अन्य घटकाला त्यांच्याकडूनच मदत मिळेल. कारण आज पुन्हा एकदा राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ते कुठेही कमी पडणार नाहीत असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात भेट झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे काल बंगळुरूत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे ही भेट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.