जेजूरी : प्रतिनिधी
जमिनीच्या वादातून जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मेहबूबभाई पानसरे यांची शुक्रवारी निर्घृण हत्या झाली. या प्रकरणी आता जेजूरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांनाही सासवड न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पानसरे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पानसरे यांच्या हत्येप्रकरणी जेजूरी पोलिसांनी महिला आरोपी किरण वणेश परदेशी (वय ३८) आणि मुलगा स्वामी वणेश परदेशी (वय १९, दोघेही रा. जेजुरी ) या दोघांना अटक केली आहे. या दोघांनाही सासवड न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मेहबूब पानसरे यांनी काही वर्षांपूर्वी नाझरे जलाशय परिसरात शेतजमीन खरेदी केली होती. या जमिनीवरून वणेश परदेशी आणि मेहबूब पानसरे यांच्यात वाद होता. काल शुक्रवारी सायंकाळी परदेशी याने पानसरे यांच्या जमिनीत नांगरणी सुरू केली होती. त्यामुळे मेहबूब पानसरे हे आपला पुतण्या राजू फिरोज पानसरे आणि साजिद युनूस मुलाणी यांच्यासह त्या ठिकाणी गेले होते. जमिनीबाबत कायदेशीर वाद मिटल्यानंतर तुम्हाला हवं ते करा असे सांगत मेहबूब पानसरे यांनी नांगरणी थांबवण्याबद्दल सांगितले.
त्यावरून वणेश प्रल्हाद परदेशी, महिला आरोपी किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी, काका परदेशी आणि लाल शर्ट घातलेल्या अनोळखी इसमाने पानसरे यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. याचदरम्यान, वणेश परदेशी याने मेहबूब पानसरे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्याचवेळी इतर आरोपींनी कोयता आणि पहारीने मेहबूब पानसरे यांच्यावर जवळपास १० ते १५ वार केले. पानसरे यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला.
पानसरे हत्येप्रकरणी दोघांना अटक
या घटनेनंतर मेहबूब पानसरे यांना जेजूरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुण्याला हलवण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर जेजूरी पोलिसांनी राजू पानसरे यांच्या फिर्यादीवरून वणेश परदेशी, त्याची पत्नी किरण परदेशी, मुलगा स्वामी, चुलता काका परदेशी आणि एका अनोळखी इसमाविरोधात भादंवि कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. जेजूरी पोलिसांनी यातील दोघा आरोपींना अटक केली असून उर्वरीत आरोपी फरार आहेत.
मेहबूब पानसरे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
काल उपचारादरम्यान मेहबूब पानसरे यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर जेजूरीसह परिसरावर शोककळा पसरली. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेले मेहबूब पानसरे हे उद्योजक म्हणूनही प्रसिद्ध होते. जेजूरी परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. आज सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.