पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील सदाशिव पेठेत प्रेमसंबंधाला नकार देणाऱ्या युवतीवर तिच्याच मित्राने कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत गृहामंत्र्यांसह पोलिस प्रशासनाला कानपिचक्या दिल्या आहेत. राजकीय कलगीतुऱ्यातून गृहमंत्र्यांना कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास वेळ मिळत नसल्याचा टोलाही त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेत एका युवतीवर शंतनू जाधव या युवकाने प्रेमसंबंधाला नकार दिल्यामुळे कोयत्याने हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेचा निषेध करत पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वेळ मिळत नसावा असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे. अजित पवार यांनी ट्विट करत या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या ट्विटमध्ये अजित पवार म्हणतात, ‘विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.’