मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर मिमिक्री करत टीका केली होती. या टीकेला आता अजित पवार यांनी खास शैलीत उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांना मिमिक्री करण्याशिवाय काय येतं असा सवाल करत तो तर त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे असा टोला अजितदादांनी लगावला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते. त्यांनी आज पहाटे ६ वाजल्यापासून बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी करत आढावा घेतला. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात झालेल्या जनता दरबारानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांच्या टीकेबद्दल विचारलं असता त्यांनी खास शैलीत उत्तर दिलं.
राज ठाकरे यांना मिमिक्रीशिवाय काय जमतं? असा सवाल करत मिमिक्री करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे असा टोला अजित पवार यांनी लगावला. राज ठाकरे यांना आजवर जनतेनं नाकारलं आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी १४ आमदार निवडून आणले. त्यानंतरच्या निवडणुकीत केवळ एकच आमदार निवडून आला. तोही आमच्या सहकाऱ्यांनी निवडून आणला असंही अजित पवार म्हटलं आहे.
राज ठाकरे यांच्यासोबतचे अनेकजण त्यांना सोडून गेलेत. त्यामुळे त्यांना माझी मिमिक्री करणं आणि माझं व्यंगचित्र काढण्यात समाधान वाटतं. यातून त्यांना आनंद मिळत असेल तर त्यांना शुभेच्छा असंही अजित पवार यांनी यावेळी नमूद केलं.