मुंबई : प्रतिनिधी
मी पक्षाच्या अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेताना तुमच्याशी बोलायला हवं होतं. मात्र तुम्ही नकार द्यावा म्हणून मी तुमच्याशी न बोलता निर्णय घेतला. परंतु आता तुमच्या भावना लक्षात घेऊन एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ. त्यानंतर मात्र तुम्हाला इथं बसण्याची गरज भासणार नाही असं सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नव्याने संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
आज यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेत शरद पवार यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आपण जो निर्णय घेतला तो पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने घेतला. नवीन नेतृत्व त्यातून निर्माण व्हावं हा हेतु होता. परंतु हा निर्णय घेताना मी आपल्याशी बोलणं आवश्यक होतं. मात्र तुम्ही लोक या निर्णयाला संमती देणार नाही अशी खात्री मला होती. त्यामुळे एकतर्फी हा निर्णय घेतला.
मागील दोन दिवसांत महाराष्ट्रासह देशभरातील विविध कार्यकर्ते भेट घेत आहेत. त्यामुळे आता राज्याबाहेरील कार्यकर्त्यांशी बोलून आपण येत्या एक ते दोन दिवसांत निर्णय घेऊ. हा निर्णय घेताना तुमच्या भावनांचा निश्चितपणे आदर केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचवेळी येत्या दोन दिवसानंतर तुम्हाला इथे बसण्याची गरज भासणार नाही असं सांगत त्यांनी नव्याने संकेत दिले आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी संवाद साधल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आनंद साजरा केला. मात्र निर्णय आल्यानंतरच यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेरून जाणार असल्याचेही यावेळी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.