पुणे : प्रतिनिधी
आपल्या अदांमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून एका अल्पवयीन मुलाला या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता असून पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.
आपल्या अदा आणि हावभावांमुळे गौतमी पाटील अल्पावधीत प्रसिद्ध झाली. तिच्या नृत्यातील आक्षेपार्ह हावभावावरून वादही निर्माण झाले होते. मात्र तिने माध्यमांसमोर येत माफी मागत पुढील काळात अशी चूक करणार नाही असे स्पष्ट केले होते. या दरम्यानच्या काळात गौतमीचा कपडे बदलतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला होता. या प्रकरणी गौतमीने संताप व्यक्त करत संबंधितांचा शोध घेण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. विशेष म्हणजे, राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली होती.
पुण्यातील विमाननगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला होता. तपासादरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार पुणे पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्या आई-वडिलांनाही पोलिस ठाण्यात बोलावले आहे. या मुलासोबत आणखी एकाचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.