मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत घेतलेल्या निर्णयावर येत्या दोन-तीन दिवसांत विचार करु अशी भुमिका घेतली आहे. सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरवर ठिय्या देवून बसलेल्या कार्यकर्त्यांशी बोलताना ही माहिती दिली.
लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहिर केला. त्यानंतर राज्यभरात कार्यकर्त्यांनी भावूक होत निर्णय मागे घेण्याची मागणी केली. त्याचवेळी यशवंतराव चव्हाण सेंटरवर कार्यकर्त्यांनी ठिय्याही मांडला होता.
सायंकाळी अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, रोहित पवार, पार्थ पवार आदींनी शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली. या चर्चेनंतर अजित पवार यांनी आंदोलक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या निर्णयाबाबत दोन-तीन दिवस विचार करुन दिशा ठरवू अशी शरद पवार यांची भुमिका असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं..
माझ्या निर्णयानंतर ज्यांनी ठिय्या मांडला आहे त्या कार्यकर्त्यांनी घरी जावं. तसेच राजीनामे मागे घ्यावेत, त्यानंतरच मी पुढील दोन-तीन दिवसात या निर्णयाचा विचार करेल अशी स्पष्ट भुमिका शरद पवार यांनी घेतल्याचे सांगत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, शरद पवार आता त्यांच्या निवृत्तीबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.