दौंड : प्रतिनिधी
दौंडमध्ये भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सातजणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने नात्यातील मुलीला पळवून नेल्यामुळे बदनामीच्या भीतीने वडिलांसह कुटुंबातील सातजणांनी जलसमाधी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर दौंडसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पती, पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह तीन चिमूकल्यांचे मृतदेह भीमा नदीत सापडले आहेत.
आत्महत्या केलेल्यांमध्ये मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे यांच्यासह रीतेश फुलवरे, छोटू फुलवरे आणि कृष्णा फुलवरे या चिमुकल्यांचा समावेश आहे. याबाबत माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे संबंधित पवार कुटुंबीय वास्तव्यास होते. मोहन पवार यांच्या मुलाने नात्यातीलच एका मुलीला पळवून नेले होते. त्याने मुलीला परत आणावे यासाठी पवार कुटुंबीय आग्रही होते.
वारंवार सांगूनही आपला मुलगा मुलीला परत आणत नसल्याने आणि बदनामीच्या भितीमुळे पवार कुटुंबीयांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यानुसार दि. १७ जानेवारी रोजी रात्री दौंड तालुक्याच्या हद्दीत पवार कुटुंबातील सातजणांनी भीमा नदीपात्रात आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
यातील चौघांचे मृतदेह शिरूर-चौफुला रस्त्यावरील पारगाव येथे भीमा नदीपात्रात आढळले होते. सलग तीन दिवस मृतदेह सापडत असल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेमागे घातपाताची शक्यताही वर्तवण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित घटनेचा कसून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मुलाच्या कृत्यामुळे समाजात बदनामी होईल ही भिती संबंधित कुटुंबीयांना होती. मुलगा ऐकत नसल्यामुळे पवार कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे दौंडसह परिसरात खळबळ उडाली आहे.