पुणे : प्रतिनिधी
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. आपला कुठलाही देव आणि महापुरुष बॅचलर नाहीत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्या नवीन वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित युवा संवाद कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी देव आणि महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. आपला कोणताही देव अथवा महापुरुष बॅचलर नाही. संसार बघून सगळ्या गोष्टी करता येतात. सेवाही साधली जाते. सर्वांचे रक्त लाल असून कुणाचेही हिरवे किंवा निळे रक्त आढळणार नाही. देवाने माणसाला घडवताना कोणताही भेदभाव केला नाही. सगळ्यांना कान, नाक, डोळे आणि शरीर या समान गोष्टी देवाने दिल्या आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
इंग्रज आल्यानंतर आपली संस्कृती बदलली. सर्वांनाच आपल्या संस्कृतीचा विसर पडला. आपण आईला मम्मी आणि वडिलांना पप्पा म्हणायला सुरुवात केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ‘हिंदू हा धर्म नसून एक विचार आहे. हिंदू राजाने कधीही कोणत्या धर्मावर आक्रमण केले नाही. हिंदू शब्दामध्येच सर्वधर्मसमभाव आहे. एकच देव ही संकल्पना हिंदू विचारांमध्ये मांडण्यात आल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना नमूद केले.