बारामती : प्रतिनिधी
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणात बारामती शहर पोलिस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाई फेकणारा मनोज गरबडे आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड याच्यासह अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश गायकवाड याने काल करंजेपुल येथे आंदोलन करत चंद्रकांत पाटील यांना काळे फासणाराला ५१ हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.
भाजपाचे पांडुरंग कचरे यांनी याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून अनेक ठिकाणी पाटील यांचा निषेध करण्यात आला.
बारामती तालुक्यातल्या करंजेपूल येथे काल चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांना काळे फासणाऱ्या इसमाला आपण ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊ, असे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी जाहीर केले होते. त्यानंतर काही तासातच पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे याने शाई फेकली. त्यानंतर या घटनेचे समर्थन करत ऋषिकेश गायकवाड यांनी मनोज बरकडे याला ५१ हजार रुपयांचा बक्षीस देऊन त्यांचा बारामतीत भव्य सत्कार करण्यात येईल असे सोशल मीडिया वरून जाहीर केले.
या सर्व घटनेनंतर भाजपचे पांडुरंग कचरे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यानुसार शहर पोलिसांनी भादंवि कलम ३५३, १०९, १४३, १४९, ५०४, ५०६ नुसार ऋषिकेश गायकवाड मनोज गरबडे यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.